सरकारी "खा"त्याचा अनुभव

माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर (१९९६ ची गोष्ट ) मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला ठाण्याला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे ग्रुहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, "आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही." हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले "नाही, काही नको. ते आमचं प्रिन्सिपल आहे." smiley नंतर १५ मिनिटात त्यांनी माझे काम केले.

अजून १ थोडासा वेगळा अनुभव. ४-५ वर्षापुर्वी मी ठाण्याचा फ्लॅट विकला, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेलो होतो. १ एजंट माझं काम करणार होता, म्हणून मी तिथे उभा होतो. तेव्हा १ गरीब बाई हमसून हमसून रडताना दिसली. ती म्हणत होती "काय वो साएब, माझा काम कराना. आता १० वेळा आले इथे. दरवेळी म्हणता, हा कागुद आणा, मग तो कागुद आणा. मला बदलापूरवरून यावं लागतं. मी भाजी विकते, माझा खाडा होतो, रातच्याला खायला कसं मिळणार..." वगैरे वगैरे. तिच्या बरोबर १ लहान मुलगा होता, तो बिचारा भेदरून इकडेतिकडे बघत होता.

म्हणून मी त्या क्लार्कला म्हणालो, "अहो, जाऊ द्या ना, गरीब बाई आहे, करून टाका तिचं काम." तर मला म्हणाला "अहो साहेब, तुम्हाला काय सांगू. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला दिसतंय, ती गरीब आहे. तिनं तर रेल्वेचं तिकिट पण काढलं नसणारं आहे, तेव्हडे पण पैसे नाहीत तिच्याकडे. पण मी काय करु? मी तिचं काम केलं तर साहेब बोलणार, ह्यानं काम केलं आणि मला पैसे दिले नाहीत, म्हणजे माझे पैसे खाल्ले. आता मी तिच्यासाठी स्वतःच्या खिशातून तर पैसे देऊ शकत नाही ना? तुम्ही सांगा, मी बरोबर की चूक?" मला काय बोलावे ते कळेना. मी १००० रुपये त्याला दिले आणी सांगितलं की तिचं काम करा. त्या क्लार्कने तिला बोलवून तिचं काम केलं, तर तिने अक्षरशः त्या क्लार्कचे पाय धरले. तिला काही माहित नाही, की त्याचे मत का बदलले, पण मुद्दा तो नाही.

आज इतक्या वर्षानंतर पण मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. त्या लहान मुलाचा केविलवाणा चेहरा दिसतो. मी बरोबर केलं की चूक, मला माहीत नाही. जे केलं ते स्वतःसाठी, स्वतःच्या समाधानासाठी केलं. पण एक विचार मात्र मनात नक्की येतो की आकाशचं जर फाटलयं, तर मी तरी ठिगळं कुठे कुठे लावणार?

मराठी: 
Rating: