माचू पिक्चू - भाग १

गेल्या अनेक वर्षांपासून मला माचू पिक्चूला जायची इच्छा होती आणि ते पण कसे तर पूर्वीच्या काळी इंका लोक जसे पायीपायी तिथे जायचे तसे. हा ४ दिवसाचा प्रवास "क्लासिक इंका ट्रेल" म्हणून ओळखला जातो आणि तो बर्यापैकी कठीण समजला जातो.

माचू पिक्चू हे जगातील ७ आश्चर्यापैकी १ आहे आणि युनेस्को हेरिटेज साईट आहे. माचू पिक्चूला बरेच जण माचू पिचू असे म्हणतात, पण आमच्या गाईडने सांगितले की त्यांच्या केचुआ भाषेत  "माचू पिचू" चा अर्थ असभ्य (म्हणजे न सांगण्यासारखा) आहे आणि पिक्चू हाच उच्चार बरोबर आहे. तर माचू म्हणजे old or ancient आणि पिक्चू म्हणजे पर्वत.  तिथे इंका राजाची वसाहत (estate) होती आणि मंदिरे होती. अगदी वर मंदिर बांधण्याचे कारण म्हणजे इंका लोकांचा समज होता की जितक्या वर आपण राहू तितक्या जवळ आपण देवाच्या जवळ आपल्याला राहता येईल.

माचू पिक्चूला खूप पर्यटक जातात आणि १४ व्या शतकातील या वास्तूची नासाडी होऊ शकते या भीतीने आता तिथे परमिट पद्धत सुरू केली आहे. इंका ट्रेलसाठी इथे रोज फक्त ५०० परमिट देतात, ज्यात साधारण ३०० पोर्टर असतात आणि उरलेले २०० ट्रेल करणारे. साहाजिकच परमिटसाठी साधारण ६ महिने आधी बुकिंग करावे लागते. प्रत्येक परमिट हे पासपोर्टशी संलग्न असते आणि ते दुसर्या कुणालाही ट्रान्स्फर करता येत नाही. जर पासपोर्ट विसरला किंवा पासपोर्ट बदलला तर इंका ट्रेलवर जाता येत नाही. प्रत्येक चेकपोस्टवर माझा पासपोर्ट तपासला गेला. इथे ऑकटोबर ते एप्रिल पाऊस असतो. फेब्रुवारीत तर हा ट्रेल पावसामुळे बंदच असतो. जून-जुलै-ऑगस्ट हा पीक सिझन असतो, त्यामुळे मी शोल्डर सिझन बघून जायचे ठरवले आणि ३ ते ६ नोव्हेंबर २०१७ असे परमिट काढायचे ठरवले. आता आयुष्यात एकदाच जातोय तर मग माचू पिक्चूच्या समोरच हुआना पिक्चू (young mountain) आहे, तिथे पण हायकिंग करायचे ठरवले. हुआना पिक्चू साठी वेगळे परमिट लागते आणि तिथे फक्त ४०० लोकांना जायची परवानगी देतात. इंटरनेटवर बराच रिसर्च करून कुठल्या कंपनीबरोबर जायचे ते ठरवले आणि ऍडव्हान्स पैसे भरले.

माचू पिक्चू साधारण ८,००० फूट उंचीवर आहे, म्हणजे फार विशेष नाही. पण इंका ट्रेलवरचा सर्वोच्च पॉईंट Dead Woman's Pass आहे जो १३,८०० फूट आहे आणि अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो.  शिवाय ट्रेलमध्ये झपाट्याने ८८०० फूट ते १०,८०० फूट, मग १३,८०० फूट मग ११,८०० फूट असा फार बदल होतो. म्हणून किमान २ दिवस तरी कुस्को शहरात acclimatization करावे लागते जिथे उंची १०,५०० फूट आहे आणि ते माचू पिक्चूपेक्षा जास्त उंचीवर आहे. अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होतो का हे बघण्यासाठी मी गेल्या वर्षी लेह-लडाखला जाऊन आलो. लेह साधारण ११,५०० फूटांवर आहे. तिथे ऑक्सिजनची कमतरता जाणवली होती, पण मी मॅनेज केले होते, त्यामुळे इंका ट्रेल जमू शकेल असे वाटले होते. शेवटी एकदाचे कुस्कोमध्ये हजर झालो, परमिट पदरात पडले आणि माचू पिक्चू चढाईला सज्ज झालो.

फोटो: इंका ट्रेल

फोटो: माचू पिक्चू आणि हुआना पिक्चूचे परमिट

<क्रमशः>

 

Rating: