माचू पिक्चू - भाग २

दिवस १

ज्या दिवशी ट्रेल सुरू होणार होता त्याच्या आदल्या दिवशी ओरिएन्टेशन झाले, ज्यात सर्व माहिती देण्यात आली आणि गाईडची ओळख पण झाली. ट्रेलच्या पहिल्या दिवशी सकाळी ३ वाजता उठलो कारण हॉटेलवरून ४ वाजता पिकअपचे ठरले होते. सगळ्यांना हळूहळू पिकअप करत-करत, गावभर फिरून झाल्यावर एकदाची बस गावाबाहेर पडली. आता प्रत्यक्ष ट्रेल सुरु होण्याच्या ठिकाणी जायला, २ तास बसमध्ये बसावे लागणार होते. दीड-एक तासाने बस एका ठिकाणी थांबली, का तर म्हणे कुणाला तिथे टॉयलेटला जायचे असेल तर फुकट टॉयलेट होत्या. लवकरच समजले की ते त्यांच्या "मित्राचेच" ठिकाण होते कारण इतर अनेक गोष्टी तिथे विकायला ठेवल्या होत्या. मी थोडे पॉवरबार आणि चोकोलेट्स घेतली. पेरूमध्ये १ जाणवले की बर्याच ठिकाणी टॉयलेटला १ सोल (१ डॉलर = ३.२५ सोल्स) असे पैसे घ्यायचे. पण अशा डोंगरात राहाणार्याना, लोकल लोकांना मदत म्हणून पैसे द्यायला काही वाटले नाही. किमान तशा चांगल्या सोयी तरी होत्या. गेल्या वर्षी लडाखला प्योनगॉन्ग लेकमध्ये एकाला अगदी आवडीने मूत्र विसर्जन करताना पाहिले होते, त्यापेक्षा पैसे देऊन सोई वापरायला काही वाटले नाही. सॉरी, थोडे अवांतर झाले.

आमच्या ग्रुपमध्ये आम्ही १५ जण होतो. माझ्याबरोबर माझा शाळेतला मित्र होता जो कॅनडाहून आला आणि शिवाय माझ्याइथला १ मित्र, टोनी, पण होता. १ कपल स्पेनहून आले होते, ३ मुली तैवानच्या होत्या, ४ जणांचा १ ग्रुप मिनियापोलीस आणि अजून १ जण जी नर्सचे काम करते, ती एकटी कॅलिफोर्नियाहून आली होती. याशिवाय नुकतेच लग्न झालेले १ कपलपण हनिमूनसाठी फ्रान्सहून आले होते. काही दिवसापूर्वी मी १ व्हिडीओ बघितला होता ज्यात २ दुर्गमित्रांचे लग्न महाराष्ट्रातच कुठेतरी, डोंगरावर अधांतरी दोरखंडाला लटकताना झाले, असे दाखवले होते. असतात एकेकाच्या आवडी असे म्हणून नंतर मी ते विसरलो पण. हनिमूनला आलेल्या त्यां दोघांना बघून मला नेमकी त्याच व्हिडीओची आठवण आली. त्या हनिमून कपलला बघून मी मनातल्या मनात कपाळाला हात लावून घेतला.

किमी ८२ ह्या ठिकाणाहून इंका ट्रेल सुरू होतो. त्याच्या जवळच आधी आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. खरं सांगायचं तर टॉयलेटच्या सोयी बघून मी पहिला दिवस फार काही खाल्लेच नाही, पण नाही म्हटले तरी फलाहार मात्र भरपूर केला.

फोटो: पहिला ब्रेकफास्ट. हिरव्या शर्टात डावीकडे दिसतोय तो लीड गाईड लिझान्द्रो आणि मधोमध दिसतोय तो पातो. या पातो नावाची पण गम्मत आहे. मला लिझान्द्रोने सांगितले की तू त्याला पातो ऐवजी पातितो म्हण कारण पातितो म्हणजे young. मला वाटले हे चांगले आहे, मग मी त्याला पातितो म्हणायचो तर इतर पोर्टर खुदूखुदू हसायचे. मला कळेचना की माझे काय चुकतेय? मग मी हळूच तिसऱ्या गाईड फेलिओला विचारले की पातितो म्हणजे काय? तर तो म्हणाला duckling. तो बदकासारखा चालतो असे आम्ही त्याला चिडवतो. तेव्हा मला खरे कारण कळले. म्हणजे लिझान्द्रोने माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार केली होती तर. मग मी त्याला पातो म्हणायला लागलो. (त्याचे खरे नाव वेगळेच काही तरी होते, सर्व जण त्याला पातो म्हणायचे). हा लिझान्द्रो खूप गमतीशीर होता आणि नेहमी जोक्स सांगून वातावरण हलके-फुलके ठेवायचा.

ब्रेकफास्ट झाल्यावर चेकपॉईंटला आलो. तिथे प्रत्येकाचे परमिट, पासपोर्ट नंबरसकट २-२ दा तपासण्यात आले. खरे तर ग्रुपमध्ये १६ जण असणार होते, पण १ जण आयत्यावेळी येऊ शकला नाही असे कळले. ६ महिने वाट बघून परमिट हातात असूनपण त्याला येता आले नाही, म्हणजे त्याला नक्कीच वाईट वाटले असणार.

फोटो: इंका ट्रेलची सुरुवात झाली किमी ८२ ह्या ठिकाणाहून. प्रत्येक ग्रुप या ठिकाणी फोटो साठी थांबतोच.

सुरुवात एकदम झकास झाली. (अजून कल्पना न्हवती ना की पुढे काय आहे त्याची). हवा एकदम छान होती. शुद्ध हवा, काही प्रदूषण नाही. सकाळी ८:३० ला सूर्यप्रकाश पण छान होता. दिवसा पुढे मात्र भरपूर सनस्क्रीन आणि गॉगल वापरावेच लागले. उगीच गडबड नको म्हणून माझ्याकडे ३ कॅमेरे होते म्हणजे त्यात १ पॉईंट-अँड-शूट आणि १ मोबाईलमधला होता. शिवाय दोन्ही कॅमेराच्या १-१ स्पेर बॅटरी पण होत्या, कारण एकदा ट्रेल सुरू झाला की चार्जिंगची काहीही सोय नाही. मग काय, फोटो काढायला सुरुवात केली. इतकी तयारी असून पण आयत्या वेळी एका कॅमेराचे कार्ड फुल झाले, कारण ते निघताना साफ केले न्हवते. :(

फोटो: अँडीज पर्वत.


 

फोटो: पेरूरेल. रेल्वेने माचू पिक्चूला जाणारे लोक दिसले.

 

फोटो: उरूबाम्बा नदी

 

फोटो: लाक्कतापाता येथील इंका साईट. इथे आम्ही साधारण ११:३० ला पोहोचलो.


 

फोटो:= इंका साईट बघता बघता थोडी विश्रांती.

 

इथपर्यंत आम्ही सगळे एकत्र चालत होतो. यापुढे स्वतंत्र जाऊ शकता असे सांगितले. लंचसाठी अजून १.५ तास बाकी होता, म्हणजे साधारण १ च्या सुमारास लंच साईटवर पोहोचा असे सांगितले. आणि त्याच्या नंतर अजून २ तास चढ होता. ग्रुपमध्ये वयाने सगळ्यात जास्त मी आणि माझा मित्र असेच होतो, बाकीचे सगळे २७ ते ३१ या वयोगटातले होते. इथपर्यंत प्रवास ठीक झाला, पण पुढे मात्र चढ सुरू झाला तशी-तशी हालत खराब व्हायला लागली.तरुण लोक पुढे निघून गेले. मी पण उत्साहाच्या भरात भराभर जायचा प्रयत्न केला, पण ब्रेथलेसनेस आला तसा वेग कमी कमी झाला. पण हळूहळू का होईना मी जात राहिलो आणि साधारण १:१५ च्या सुमारास लंच साईटवर पोचलो. तिथे मी बर्याच जणांना उलट्या दिशेने परत जाताना बघितले, तेव्हा कळले की ते ट्रेल सोडून माघारी परत जात आहेत. त्यात काही ३०-३५ वयाचे पण लोक दिसले. माझी पण अशी स्थिती होते की काय, असे क्षणभर वाटून गेले. पण आयुष्यातली १ संधी अशीच वाया घालवायची मनाची तयारी न्हवती, पण बॅकपॅकमध्ये खूप सामान आहे हे मला जाणवायला लागले. जॅकेट, २ लिटर पाण्याचे वजन २ किलो, कॆमेराचे वजन १ किलो, त्याच्या स्पेअर बॅटरीज, सनस्क्रीन, टॉयलेट पेपर, गॉगल वगैरे वगैरे मुळे बॅकपॅक चांगलीच जड झाली होती आणि माझे खांदे प्रचंड दुखायला लागले. वजन उचलणे इतके कठीण झाले की मी जास्त पैसे देतो पण माझी बॅकपॅक पोर्टरने घेऊन जा, असे सांगितले. होय-नाही करत हेड पोर्टर शेवटी तयार झाला (कारण प्रत्येक पोर्टरच्याकडे ऑलरेडी खूप सामान असते. ) त्यामुळे या दिवसाचे पुढचे अजून फोटो काढता आले नाहीत. सोबत अजिबात वजन न्हवते तरी माझ्या मित्राला सोबत घेऊन, पुढच्या २ तासाचा प्रवास मी रखडत रखडत अडीच तासात कसा तरी पूर्ण केला आणि ४:३० ला कॅम्प साईटवर कसाबसा पोचलो. हा प्रवास किती कठीण आहे याची ही तर फक्त चुणूक होती. कॅम्प साईटवर जाऊन पहिले गरम पाण्यात पाय बुडवून बसलो आणि गरम-गरम कोका टी प्यायलो. (कोकाच्या पानापासूनच कोकेन हे मादक द्रव्य बनवतात.)

तिथे आमचे टेन्ट आधीच तयार केले होते आणि सामान पण ठेवण्यात आले होते. या पोर्टर्सची खरंच कमाल असते. आम्ही कॅम्प सोडून निघालो की त्याच्यानंतर हे पोर्टर्स सर्व आवरून निघतात, प्रत्येक पोर्टर पाठीवर जवळपास ३० किलो वजन उचलून, इतक्या स्टीप मार्गावर जातो, आम्हाला मागे टाकून पुढे जाऊन सर्वजण जय्यत तयारी करून आमची वाट बघतात आणि या इतक्या कष्टाच्या कामाचे त्यांना ४ दिवसात जेमतेम १००-१५० सोल्स ($३०-४०) टिप्समध्ये मिळतात. पण पोटासाठी करतात इतके अपार कष्ट, कारण इतर कामात तर इतके पण पैसे मिळत नाहीत म्हणे. तर माझा टेन्ट तयार होता म्हणून मी सामान उघडले आणि स्लीपिंग बॅग अंथरली,  पायातले बूट काढून मी चपला आधीच घातल्या होत्या. आणि जरा निवांत बसलो. मला एकट्याला त्यांनी स्वतंत्र टेन्ट दिला होता, बहुधा माझी हालत बघून. इतक्यात टेन्टच्या बाहेर आरडाओरडा ऐकू आला. काय झाले म्हणून बाहेर आलो तर माझ्या सोबत आलेला टोनी आमच्या गाइडबरोबर वादावादी करत होता. त्याचे म्हणणे होते की त्यांनी माझ्या मित्राला माझ्याबरोबर एकत्र का ठेवले नाही? कारण ते दोघे शाळेपासूनच मित्र आहेत आणि मी याला ओळखत पण नाही फारसा. त्याने अधिकचे पैसे देतो पण मला स्वतंत्र टेन्ट द्या, असे ऑफिसमध्ये सांगितले होते असे त्याचे म्हणणे होते. सांगूनपण तुम्ही मला स्वतंत्र टेन्ट का नाही दिला? असे त्याचे म्हणणे होते. मी म्हणाले की माझ्या मित्राला माझ्या टेन्टमध्ये पाठव किंवा मी तिथे जातो, तू इथे ये. तर गाइडचे म्हणणे होते, आता अंधार झाला आहे, जेवायची वेळ झाली आहे, आज जरा  ऍडजस्ट केले तर बरे, उद्यापासून तुला स्वतंत्र टेन्ट देतो. शेवटी तो कसाबसा तयार झाला पण मग त्या दोघांच्या स्लीपिंग बॅगच्या मधोमध स्वतः:ची डफेल बॅग मधोमध ठेवून त्याने भारत-पाकिस्तान सीमारेषा आखली. त्यामुळे माझा मित्र मग जाम वैतागला. इतक्या individualistic लोकांनी ट्रेलला येऊच नये, असे त्याचे मत पडले. शेवटी त्याला मी कसेबसे समजावून जेवायला गेलो, पण ट्रेलमध्ये यापुढे त्यांचे नेहमी बिनसलेलेच राहिले.

रात्री परत जेमतेम जेवण करून लवकर झोपायला गेलो कारण दुसर्या दिवशी परत ४ वाजता उठायचे होते. झोप काही फार गाढ लागली नाही. दुसरा दिवस सगळ्यात कठीण आहे, हे फक्त ऐकून होतो. त्याची प्रचिती लवकरच येणार होती.

(क्रमशः)

इथे टाकलेले फोटो आकाराने लहान आहेत. फोटोवर क्लिक केले तर मोठ्या आकारातले फोटो बघता येतील, जे अधिक सुस्पष्ट आहेत.

Rating: