माचू पिक्चू - भाग ३

दिवस २

आज सकाळी ४ च्या थोडे आधीच जाग आली. ४ वाजता गरमगरम लेमन टी देण्यात आला. ब्रेकफास्ट करून आम्ही ५:५० ला ट्रेलवर चालायला सुरुवात केली. कालच्या अनुभवातून शिकल्यामुळे मी बॅकपॅकमध्ये फक्त माझे जॅकेट आणि पाणी घेतले होते. कॅमेरा पण फक्त मोबाईल फोनचा होता. मी घड्याळात बघितले की आज आम्ही ५:५० ला चालायला सुरुवात केली होती.

फोटो: चालायला सुरुवात करण्यापूर्वी सगळे पोर्टर्स आम्हाला शुभेच्छा देत आहेत.


 

फोटो: फार नाही, आज फक्त १६ किमी चालायचं आहे. समोर दिसतोय तो डोंगर ओलांडला की झालंच समजा.


 

फोटो: पोर्टर्स कसे जात आहेत, तस्संच जायचं फक्त.


 

आज सगळ्यांच्या बरोबर चालायचे म्हणजे एकमेकांची साथ झाल्याने आपोआप पुढे जाता येईल, असे ठरवले होते. त्या हेतूने मी ग्रुपच्या मधोमध राहून चालायला सुरुवात केली, पण खरोखर सांगतो की जेमतेम १ चढ वर गेलो आणि सुरुवात केल्यापासून १० मिनिटाच्या आतच माझा श्वास जड झाला आणि ब्रेथलेसपणा जाणवू लागला. माझे हृदयाचे ठोके पण वाढले आहेत, असे मला वाटू लागले. मी काही आज ११ तासाचा ट्रेल चालू शकणार नाही हे मला लगेच कळले आणि मी गाईडला सांगितले की मला बहुधा परत जावे लागणार आहे. तेव्हा त्याने मला चघळायला कोकाची पाने दिली आणि दर ५-१० मिनिटांनी एक दोन घोट पाणी प्यायला सांगितले. गाईड, फेलिओ म्हणाला की तू अगदी हळू-हळू चालत जा, तुला पण जमेल. त्यामुळे थोडा धीर आला. मी अक्षरश: एकावेळी १ पाऊल पुढे टाकायचो, मग दुसरा पाय V-shape मध्ये पुढे आणायचो आणि पहिल्या पायाच्या शेजारी ठेऊन मग पहिले पाऊल पुढे टाकायचो. असे करत करत, एका वेळी एक-एक पायरी चढत मी पुढे सरकत गेलो. माझा मित्र सतत माझ्या सोबत होता, फेलिओ आणि पातो पण माझ्या बरोबरच येत होते. या पद्धतीमुळे मी खूपच हळू चालत होतो पण नंतर मग जाणवले की माझा हार्टरेट हळूहळू कमी होत गेला. धुकेपण खूप होते, त्यामुळे मग मी दीर्घ श्वास घेत होतो की ज्यामुळे ऑक्सिजन जास्त वेळ फुफ्फुसात राहील. मी एका अर्थाने स्वतः:च मनाशी बोलत होतो की कितीही वेळ लागला तरी चालेल, पण जर दम लागत नसेल तर मला खूप हळू-हळू का होईना पण पुढे सरकता येईल. फक्त पुढचा एकच चढ बघायचा, बाकी विचार करायचा नाही असे ठरवत चालत होतो. साधारण २ तास गेल्यावर बघितले की आमचा ग्रुप माझी वाट बघत थांबला होता. मी विचारले की किती वेळ थांबला आहात, तर ते म्हणाले की १०-१५ मिनिटे झाली. त्यांच्या बरोबर लिझान्द्रो होता, तो म्हणाला की काळजी नको, सगळ्यानाच हे कठीण जात आहे. थोड्या वेळाने जापनीज ट्रेकरचा १ ग्रुप आला त्यात बहुतेक सगळे ७० वर्षाच्या पुढचे होते आणि ते पण माझ्या सारखेच हळूहळू जात होते. (तरी माझ्यापेक्षा बऱ्या वेगात). त्याना बघून जरा अजून उत्साह आला की मला पण हे जमू शकेल. एव्हाना मला कळले की दुसरा दिवस खूप कठीण आहे असे म्हणतात, ते उगीच नाही. पण ह्युमन सायकोलॉजी आहे, सगळ्यांनाच त्रास होतोय म्हटलं की तितकेसे वाईट वाटत नाही.

फोटो: २ तास चालणे झाल्यावर. मागे ग्रुपमधील इतर मंडळी.

 

शेवटी हा केवळ शारीरिक नाही तर मनाचा पण खेळ ठरला. खंबीर मनामुळे मी माझ्या स्पीडने शेवटी १० वाजता Dead Woman's Pass च्या Summit ला पोचलो आणि मला इतका आनंद झाला की सांगता येत नाही. आता माचू पिक्चू नक्कीच जमू शकेल, हे पटले. परत फिरायचे असेल तर Dead Woman's Pass पासूनच मागे जाता येते, पण एकदा हे Summit गेले की केवळ पुढेच जाता येते, परत फिरता येत नाही. Summit ला जास्त वेळ थांबलो नाही, जेमतेम १० मिनिटे कारण ऑक्सिजनची कमतरता थोडी-थोडी जाणवत होती. पटापट १-२ फोटो काढले कारण सकाळी निघाल्यापासून इतकी हालत खराब झाली होती की १ पण फोटो काढला न्हवता.

फोटो: पोचलो एकदाचे Dead Woman's Pass ला. ट्रेलवरचे सर्वोच्च्च ठिकाण. इथे पोचल्यावर जो आनंद झाला, त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. खाली थांबलेली काही लोक दिसत आहेत. केवळ तिथून वर यायला २० मिनिटे लागली होती इतका कठीण चढ आहे.

 


 

फोटो: Dead Woman's Pass उंची ४२१५ मीटर्स = १३,८०० फूट

 

इथून पुढे लंच कॅम्प पर्यंत उतार होता आणि १.५ तासात जाता येईल असे गाईड म्हणाला, त्यामुळे पुढेच जायचे ठरवले. केवळ १० मिनिट  Summit वर थांबून १०:१० ला पुढे जायला सुरुवात केली, कारण इतक्या उंचीवर ऑक्सिजनची कमतरता जाणवते. तरी हे १४,००० फूट म्हणजे एव्हरेस्टच्या २९,००० फुटांच्या तुलनेत काहीच नाहीत. (त्यातपण ऑक्सिजन ना घेता एव्हरेस्टवर सर्वप्रथम जाणारा रेन्होल्ड मेसनर सारखा माणूस म्हणजे सुपर-ह्युमन म्हटला पाहिजे.) पुढे उतार होता, पण तरीही गुडघ्यांवर ताण येऊ नये म्हणून भराभर उतरता येत नाही. शिवाय घसरून खोल दरीत पडायची भीती असते, त्यामुळे जपूनच उतरावे लागते. पण दीड तासाच्या मानाने १ तास ५० मिनिटात, दुपारी १२ ला कॅम्पसाईटला जेवायला पोचलो. सकाळपासून १०,८०० फुटापासून सुरुवात केली आणि १३,८०० फूट उंचीवर गेलो आणि तसेच ११,७०० फुटापर्यंत खाली आलो.

फोटो: आज खरा जेवणावर तुटून पडलो.

 

जेवण झाल्यावर १ तासाभरात पुढे निघालो. Dead Woman's Pass झाला तरी अजून दुसरा Runkuracay pass बाकी होता. हा आधीच्या मानाने कमी उंचीवर म्हणजे १३,१०० फुटावर असला तरी आता ११,७०० फुटांपासून १३,१०० फूट असे वर जायचे होते आणि याचा चढ (स्लोप) सकाळच्या पेक्षा अजूनच कठीण आहे. २ तासांचा हा चढ करायला तोंडाला अक्षरश: फेस आला. दर ५-१० मिनिटांनी पाण्याचा घोट घेत घसा ओला ठेवावा लागत होता कारण ओठ आणि घसा सारखे कोरडे पडत होते.

फोटो: Runkuracay च्या वाटेवरील इंका साईटजवळ. विश्रांती घेऊन आता जरा जीवात जीव आलाय.

 


 

फोटो:हे डोंगर फोटोत किती मस्त दिसतात ना? थोड्या वेळापूर्वी मी तिथेच होतो त्या डोंगरावर. मधे खळगा दिसतोय ना, तो आहे Dead Woman's Pass. नशीब तेव्हा कुणी विचारलं नाही की डोंगर कसे दिसत आहेत ते?

 


 

Runkuracay pass नंतरच्या उताराच्या पायऱ्या तर अजूनच भयंकर आहेत. एक-एक पायरी दोन-अडीच फूट उंचीची. वॉकिंग स्टिकची उंची वाढवून, नीट लक्ष देऊन उतरायला २ तासाच्या जागी अडीच तास लागले आणि शेवटी ५ वाजून ५ मिनिटांनी मी कॅम्पवर पोचलो. पोचलो तर तिथे सर्वजण (पोर्टर सकट) उभे होते आणि मला बघितल्याबरोबर सर्वानी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. खरंतर त्याच्यामुळे मला ओशाळल्यासारखं वाटलं कारण सर्वात शेवटी पोचणारा मीच होतो. पण मग गाईड म्हणाला की ११ तासाच्या प्रवासात मी इतरांपेक्षा केवळ १ तास उशीरा पोचलो होतो, त्यामुळे वाटते तितके वाईट नाही. अर्थात आजचा दिवस पूर्ण झाला, याचाच इतका आनंद झाला होता की वाईट वाटायचा प्रश्नच न्हवता. संपूर्ण इंका ट्रेलवर दुसऱ्या दिवसाचा प्रवास सर्वात कठीण आहे.

फोटो: वातावरणात अचानक झालेला बदल. धुके अचानक वाढले आणि वारा सुटला.


 

पोचल्यावर गरमगरम कोका चहा दिला आणि मग साधारण ६ वाजता जेवायला गेलो. तिथे लिझान्द्रोने सगळ्यांना विचारले की आजचा तुमचा High point काय आणि low point काय? बहुतेकांनी सांगितले की Dead Woman's Pass ओलांडला तो High point होता. पण मी मात्र खरं सांगितलं:  The fact that I am with you today in this camp is the high point of my trail. :) जेवण नेहमीप्रमाणे रुचकर होतं. आता मात्र मी व्यवस्थित जेवायचं ठरवलं कारण उरलेले दिवस चालायला ताकद पाहिजे ना. बाहेर हवेत बदल जाणवत होता आणि जोराचा वारा सुटला होता. गाइडने उद्याचा प्रोग्राम सांगितला की उद्या उशीरा (म्हणजे ५ वाजता) उठा. जेवताना कुणीतरी विचारलं की उद्या हवा कशी असेल? पाऊस तर पडणार नाही ना? तर लिझान्द्रो म्हणाला, weather is unpredictable, just like women. त्याच्या जोकवर बहुतेक सगळे हसले, मॅथ्यू म्हणून सोबतीचा पण हसला. ते बघून त्याची गर्लफ्रेंड त्याच्यावर एकदम उखडली. हे बोलणे सेक्सिस्ट आहे, असे म्हणाली. तर तो म्हणाला, See, this is exactly what he said that women are unpredictable. झालं, हे म्हटल्याबरोबर कॅलिफोर्नियात जी नर्सचे काम करते, ती पण त्यांच्यात सामील झाली आणि म्हणाली, की तुम्ही असे फालतू जोक्स बायकांवर का करता. एकंदरीत परिस्थिती चिघळायची चिन्हे दिसायला लागली, पण नेमका तेव्हाच  जोरात पाऊस सुरु झाला आणि जेवणाच्या टेन्टमध्ये पाणी टपकायला लागले, त्यामुळे धावपळ सुरू झाली आणि तो विषय टळला. आम्ही मग पटापट आपापल्या टेन्टमध्ये झोपायला गेलो. एव्हाना पाऊस खूप जोराने पडायला लागला होता. प्रचंड थकल्यामुळे पावसाच्या त्या मधुर संगीतात कधी झोपलो ते कळलेच नाही.  

(क्रमशः)

इथे टाकलेले फोटो आकाराने लहान आहेत. फोटोवर क्लिक केले तर मोठ्या आकारातले फोटो बघता येतील, जे अधिक सुस्पष्ट आहेत.

 

Rating: